‘हमीभाव’ कशाला हवा?, आता मार्केटींग करा: सदाभाऊ खोत

0
8

मुंबई, दि.18 :: शेतकऱ्यांच्या घामाचा दाम मागत सरकारच्या नाकात दम आणणाऱ्या शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आपल्याच भूमिकेशी फारकत घेतली आहे. मुंबई येथे ११ व्या कृषि पर्यटन परिषदेत बोलताना “हमीभाव कशाला हवा, मार्केटींग करा ” असा अजब सल्ला  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांना दिल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेतकरी संघटनेची आयुष्यभराची उत्पादन खर्चावर हमीभावाच्या मागणीच्या लढाईला सदाभाऊंनी भाजपाच्या  वळचणीला जाऊन  तिलांजली दिल्याचे शेतकरी संघटनेचे जुने- जानते कार्यकर्ते  बोलत आहेत.

 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मार्केटिंग महत्वाचे आहे अस सांगत हमीभाव  काय मागता ? मार्केटींग करा, इस्राईलमधे शेतकरी कमी भाव मागत  नाही. जगाला हवे ते उत्पादित करुन मार्केटींग करतात. पतांजलीचे रामदेवबाबाही हमी भाव  मागत नाही. त्यांची  उत्पादने देशभर भन्नाट विकली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मार्केटींगवर भर दिला पाहिजे. त्यासाठी कृषी पर्यटन केंद्रावर बैठक घेऊ असे अश्वासनही सदाभाऊ खोत यांनी दिले. कृषी पर्यटन परीषदेत एका शेतकऱ्याने बँक कर्ज देत नसून आपण बँकांना आदेश द्यावेत अशी व्यथा मांडली होती. त्याला  उत्तर देताना  राज्यमंत्रीखोत म्हणाले,  बँकवाला ऐकत नसेल तर त्याला  ‘शेतकरी संघटना’ स्टाईल ने समजून  सांगावे. प्रसंगी आपणच (शेतकरी) बँकांचे मालक असे  समजून  स्वत:च आदेश द्यावेत, मग बघा कसा कर्ज देत नाही.कृषी पर्यटन धोरण अस्तित्वात असताना कृषी पर्यटन परीषदेत खोत यांनी तीन महीन्यात  कृषी पर्यटन धोरण लागू करण्याची घोषणा केली. त्यापुढे जाऊन कृषी पर्यटन परीषदेचे आयोजक पांडुरंग तावरेंना  कँबिनेट मंत्री रावळ आणि फुंडकर यांच्या उपस्थितीतच आंदोलनाचा सल्ला दिला. खोत पुढे म्हणाले, तावरे कृषी पर्यटन धोरण लागू झाले नाही तर पुढील वर्षी कृषी पर्यटन परीषद आयोजित न करता सरकारविरोधात शेतकरी संघटना स्टाईल आंदोलन करा.मी तुमच्या सोबत असेल. एकंदरीतच नुकत्याच इस्त्राईल दौऱ्यावरुन आलेल्या सदाभाऊंचा आवेश, भुमिका बदल पाहुन व्यासपीठावरील मंत्री अधिकारी आणि उपस्थित शेतकरी मात्र अवाक झाले होते.