अहंकारामुळेच खासदाराचा राजीनामा : मुख्यमंत्री

0
3

भंडारा,दि.19ः-पालघरमध्ये खासदाराचे निधन झाले म्हणून निवडणूक लागली. पण भंडारा गोंदियात काय झाले? असा प्रश्‍न उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदाराने अहंकारामुळेच राजीनामा देऊन ही निवडणूक लादल्याची प्रखर टीका आज मोहाडी येथील प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत जाहीरसभेत केली.मोहाडी येथील हुतात्मा स्मारकाजवळील पटांगणात झालेल्या या जाहीरसभेला भाजपाचे उमेदवार हेमंत पटले, माजी खा.शिशुपाल पटले  आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षात क्रांती केली, परिवर्तन केले. मुलभूत सुविधा तळागाळातील गरीब माणसापर्यंत पोहोचवल्या. गरीब महिलांना 13 कोटी मोफत गॅसचा निर्णय केला. त्यापैकी 5 कोटींना आतापर्यंत गॅस कनेक्शन मिळाले आहे. 60 लोकांना शौचालये उपलब्ध झाली, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्व गरीबांना घरे मिळणार आहेत. 2 वर्षात 4 लाख गरीब लोकांना घरे देण्यात आली आहेत. येत्या दीड वर्षात 9 लाख गरीब लोकांना घरे दिली जाणार आहेत. ही सर्व कामे भाजपाच्या केंद्रातील आणि राज्यातील शासनाने केली आहेत. माजी खासदाराने साडे तीन वर्षात काय आणले? असा प्रश्‍न उपस्थित करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या 28 मे रोजी हेमंत पटले यांच्या नावासमोरील कमळाची बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.