शिक्षणाधिकारी लोखंडे यांच्यासह तिघांची बदली

0
15

नागपूर,दि.२०ःजिल्हा परिषदेमध्ये सध्या बदलीचे वारे वाहत आहेत. जि. प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्यासह तीन अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, लेखा अधिकारी अमित अहिरे आणि पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद जाधव यांची बदली झाली आहे. लोखंडे यांच्या जागी यवतमाळचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांची नियुक्ती झाली आहे. अहिरे यांच्या जागी मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदावर प्रिया तेलकुंठे यांची नियुक्ती झाली असून, जाधव यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झाली नसल्याची माहिती आहे.
दोन वर्षांपूर्वी जि. प.चे शिक्षणाधिकारी म्हणून लोखंडे यांनी कार्यभार सांभाळला. दरम्यानच्या काळात लोखंडे अनेक प्रकरणांवरून चर्चेत राहिले. अनेकदा त्यांचे जि. प. अध्यक्ष निशा सावरकर यांच्यासोबत खटकेही उडाले. शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी योग्यरित्या पदभार सांभाळला नसल्याने शिक्षणाबाबत अनेक तक्रारी जिल्हय़ातून आल्या होत्या. या तक्रारींना घेऊन वर्षभरापूर्वी अध्यक्ष सावरकर यांनी शासनाकडे तक्रार केली होती.