भारतीय जनता पक्ष व केंद्र शासन देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे- प्रेमसागर गणवीर

0
8

भंडारा,दि.२०ः-कर्नाटक विधासभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला आहे. असे असतांना सुद्धा कर्नाटक येथील मा राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन अल्प मतात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार बनविण्याची संधी देऊन लोकशाहीचा व घटनेतील तरतुदीचा खून केलेला आहे असे परखड मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी नुकत्याच झालेल्या मेघालय, मणीपूर व गोवा या राज्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असतांना सुद्धा काँग्रेस पक्षाला सरकार बनविण्याची संधी नाकारण्यात आली होती. कर्नाटक मध्ये मात्र मा राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन मेघालय, मणीपूर आणि गोवा या राज्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. हि बाब अत्यंत चुकीची व लोकशाहीचा गळा दाबणारी आहे. यामुळेच अल्पमतात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडलेला आहे. हि बाब अत्यंत असंवैधानिक असून लोकशाहीच्या तत्वाला काळिमा फासणारी आहे. भारतीय जनता पक्ष व केंद्र शासन देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे असे दिसून येते हि बाब अत्यंत गंभीर आहे अशी सुद्धा टीका प्रेमसागर गणवीर यांनी केली.