क्रेझी केसलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना आठ जण बुडाले, दोघांचा मृत्यू

0
17

नागपूर,दि.20 – पिकनिकसाठी क्रेझी केसल मध्ये गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी सात युवक आणि एक महिला पाण्यात बुडाली. पाच जणांना तातडीने मदत मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. दोन युवकांचा मृत्यू झाला. तर, एक गंभीर अवस्थेत इस्पितळात मृत्यूशी झूंज देत आहे. रविवारी दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे उपराजधात प्रचंड खळबळ उडाली आहे.अक्षय बिंड (वय १९) आणि सागर गंगाधर सहस्त्रबुद्धे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. स्रेहल मोरघडे (वय १९) यांची प्रकृती गंभीर आहे.  मित्रांनी साथ दिली म्हणून नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले हे  युवक बचावले.

क्रेझी केसलचे प्रशासन विशिष्ट वेळेसाठी येथील स्विमिंग पुलमधील पाण्यात समुद्राप्रमाणे कृत्रिम लाटांची निर्मिती करते. त्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी रविवारी दुपारी १ च्या सुमारास विविध वयोगटातील शंभरेक जण होते. प्रशासनाने इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर करून पाण्यात लाटा निर्माण केल्या. सराव नसूनही खोलगट भागात असलेले अक्षय बिंड, सागर सहस्त्रबुद्धे,  नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले हे तरुण पाण्यात बुडाले. ते ध्यानात येताच या युवकांचे मित्र यश भारद्वाज आणि रुतूज देव यांनी आरडाओरड केली. प्रशासनाला लाटांचे पाणी बंद करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी कुछ नही होता, म्हणत  यश आणि रुतूजला गप्प बसण्यास सांगितले. मात्र, मित्रांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून या दोघांनी  नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले यांना आधार देत मानवी साखळी बनविली आणि त्यांना पाण्याबाहेर काढले. काही वेळेनंतर अक्षय, सागर आणि स्रेहललाही बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हे तिघे बेशुद्ध पडले असतानादेखिल तेथील कर्मचारी अथवा बाऊंसरने कसलीही मदत केली नाही. या मित्रांनीच आॅटो करून त्या तिघांना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे अक्षय आणि सागरला डॉक्टरांनी मृत घोषित केले. स्रेहलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.