पवनी न.प.च्या माजी उपाध्यक्षाचा खून

0
7

पवनी,दि.21ः-शेतीच्या वादातून येथील नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष दुधराम मुरारी करंभे (६५) रा. बेलघाटा वार्ड यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास पवनी येथील गोसे कालव्याच्या पुलाजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी वसंता मनोहर झिलपे (४६) रा. पाहूणगाव याला अटक केली असून दुसरा आरोपी प्रल्हाद मनोहर झिलपे फरार आहे.
दुधराम करंभे यांनी आरोपींकडून सन २00१ मध्ये शेतीचे बयानपत्र केले होते. परंतु, शेतीचे विक्री पत्र होवू शकले नाही. शेतीच्या मालकी हक्काचे अधिकारावरून परस्परात वादविवाद सुरु होते. हे प्रकरण दिवाणी व नंतर जिल्हा सत्र न्यायालयात पोहचले. दरम्यान विवादास्पद शेतीवर न्यायालयाचा अंतिम निकाल होईस्तोवर कुणालाही जाता येणार नाही अशा स्वरूपाचे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले असल्याचे समजते. आरोपी वसंता झिलपे याने शेतीचा वाद न्यायालयात सुरू असताना मृतक दुधराम करंभे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला होता, अशी तक्रार ठाण्यात दाखल आहे.
सदर तक्रारीची पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली नव्हती. शनिवारी संध्याकाळी दुधराम करंभे शेतावरून परत येत असताना गोसे कालव्या पुलाजवळ आरोपींनी त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात त्यांच्या आतड्या बाहेर निघाल्या. त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
रविवारी करंभे यांच्या कुटुंबियांनी त्यांची अंत्ययात्रा पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरून आणली व पाच मिनिटे विसावा घेतला. त्यानंतर वैजेश्‍वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी वसंता मनोहर झिलपे (४६) रा. पाऊणगाव व प्रल्हाद मनोहर झिलपे रा. पाऊणगाव यांचे विरुद्ध कलम ३0२,३४१,३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वसंता झिलपे यास अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी प्रल्हाद झिलपे चा शोध सुरू केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे करीत आहेत.