सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार – नितीन गडकरी

0
5

तिरोडा,दि.21 – राज्यातील शेतकर्‍याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्‍न सुटणार नाही. शेतकर्‍यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र शासन विचार करीत आहे. शेतीला पूरक व्यवसाय सुरु झाले तर ही स्थिती चांगली होऊ शकते. सिंचनाच्या व्यवस्था झाल्या तर सिंचन वाढणार आहे, शेतमालाचा उत्पादन खर्च कमी झाला तर शेतकर्‍याची स्थिती सुधारणार आहे. यासाठी राज्याचे सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यानी  व्यक्त केला.
भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीनिमित्त भाजपा उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ तिरोडा येथेआयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या प्रचारसभेला भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विजय राणे यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचा सत्कार गडकरी यांनी केला.
याप्रसंगी ना.गडकरी म्हणाले, ५ लाख कोटी रुपये राज्याला विकास कामांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी ४ लाख कोटींचे रस्ते आणि १ लाख कोटी रुपये सिंचनाच्या प्रकल्पासाठी देण्यात आले आहे. सिंचनाचे २६ जुने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २० हजार कोटी रुपये दिले, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी २० हजार कोटी दिले. गोसीखुर्दसाठी ८ हजार कोटी दिले. येत्या २ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. राज्यातील अपूर्ण सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करून सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
धानाच्या तणसापासून इथेनॉल निर्माण होऊ शकते. १ टन तणसापासून २८० लिटर इथेनॉलची निर्मिती होते. देव्हाडा येथे इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प लवकरच सुरु करण्यात येणार असून या परिसरातील ५०० तरुणांना हा प्रकल्प रोजगार देणार आहे. नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाने सुरु केलेल्या सर्व योजनांचा आढावा यावेळी घेतला. भाजपा हाच पक्ष विकास करू शकतो. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा मायलेकांचा पक्ष नाही, असे सांगत गडकरी म्हणाले भाजपात कार्यकर्ता मोठा होतो. या निवडणुकीची खरे तर गरज नव्हती. पण ज्याचे मन एका घरात रमत नाही, तो सतत दुसर्‍या घराचा शोध घेत असतो. हेमंत पटले हे जनतेचे उमेदवार आहे. परिस्थिती बदलायची असेल, देशाचा विकास करायचा असेल तर भाजपाचे हेमंत पटले यांना निवडून देण्याचे आवाहनही गडकरींनी केले. या जाहीरसभेसाठी हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते.