ज्ञान व माहितीचा खजिना असलेला महाराष्ट्र वार्षिकी 2018 संदर्भग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध

0
52

गोंदिया, दि. 21 – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’ हा ज्ञान व माहितीचा खजिना असलेला संदर्भग्रंथ नवीन आकर्षक स्वरुपात वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. या संदर्भग्रंथात महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा इतिहास, वन, नद्या, कृषी, क्रीडा, कला, साहित्य, पुरस्कार आदि घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे.
या वार्षिकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या सर्व विभागांची कामकाज पध्दती, संरचना, महत्वाचे निर्णय, धोरणे, योजना, दूरध्वनी यांची एकत्रित माहिती अभ्यासकांना यात उपलब्ध होणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासनाशी संबंधित गेल्या वर्षभरातील घडामोडींचा समावेशही यात केला आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, आजवरचे विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती व उपसभापती, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य यांची यादी, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकांची माहितीही या वार्षिकीत समाविष्ट करण्यात आल्याने हा संदर्भग्रंथ प्रत्येक वाचकाच्या संग्रही असणे आवश्यक आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसिध्द केलेला महाराष्ट्र वार्षिकी 2018 हा संदर्भग्रंथ विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, अधिकारी व सामान्यज्ञानाची आवड असणाऱ्या सर्व नागरीकांना उपयुक्त आहे.
महाराष्ट्राची अधिकृत, वस्तुनिष्ट माहिती देणाऱ्या संदर्भग्रंथाची गरज अनेक वर्षापासून वाचकांनी व्यक्त केली होती. महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या महाराष्ट्र वार्षिकी 2018 या संदर्भग्रंथाच्या रुपाने ही गरज पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र वार्षिकी 2018 या संदर्भग्रंथाची किंमत फक्त 250 (दोनशे पन्नास) रुपये आहे. या संदर्भ ग्रंथासाठी जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया येथे संपर्क साधवा. या संदर्भग्रंथाच्या प्रती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच पुस्तक विक्रेत्यांना सवलतीच्या दराने उपलब्ध करुन देण्यात येईल. पुस्तिकेच्या मर्यादित प्रती शिल्लक असल्याने गरजूंनी तातडीने जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवावी. असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.