अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

0
11

नवेगावबांध,दि.23ः- वनपरिक्षेत्रातील कपार्टमेंट २१४ परिसरात मोहफूल संकलन करणार्‍या इसमाचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २२ मे रोजी उघडकीस आली. सखाराम मंगरू परसो रा. चुटिया-पळसगाव असे मृतकाचे नाव आहे.
सध्या नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील जंगलात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत चुटिया येथील सखराम पसरो २१ मे रोजी कपार्टमेंट २१४ मध्ये तेंदूपत्ता संकलनाकरिता गेला होता. दरम्यान, रात्र होऊनही तो कामावरून परत न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. दरम्यान, २२ मे रोजी कंपार्टमेंट २१४ मध्ये इतर मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी आले असता सखारामचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावरील जखमांवरून त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याचे व यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे दिसते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी ए. एम. खान, क्षेत्र सहायक आर. एम. बहोरे, वनमजूर तिमाजी मसराम, नामदेव कुंभरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व घटनेची नोंद नवेगावबांध आणि चिचगड पोलिस ठाण्यात केली. यावेळी वनविभागातर्फे तातडीची मदत म्हणून २0 हजार रुपये सखारामच्या कुटुंबीयांना दिले. तसेच पीडित कुटुंबाला शासनातर्फे ८ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचे सांगितले. त्यांच्यापश्‍चात पत्नी, चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
विशेष म्हणजे, घटनास्थळापासून ४00 मीटर अंतरावर व्याघ्र प्रकल्पाचे जंगल आहे. त्यामुळे या परिसरातील जंगलात वन्यप्राण्यांचा वावर राहत असून मजुरांना जिव मुठीत घेऊन तेंदूपत्ता संकलनाचे काम करावे लागते.