एमआरईजीएसच्या कामावर आढळला जिवंत बॉम्ब

0
11

गडचिरोली,दि.२४ : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामादरम्यान मजुराच्या टोपल्यात मातीसोबत जिवंत हॅन्डग्रेनेड आढळल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने दुर्घटना टळली असली तरी त्या ठिकाणी ते हॅन्डग्रेनेड आले कसे, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही घटना देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे गुरुवारी (दि.२४) दुपारी घडली.प्राप्त माहितीनुसार, कोकडीनजीकच्या नाल्यात रोजगार हमी योजनेवरील मजूर खोदकाम करून फावड्याने माती काढत असताना वासुदेव भेंडारे या मजुराच्या टोपल्यात मातीसोबत एका प्लास्टिक पिशवित ठेवलेले हॅन्डग्रेनेड आले.
ही काय वस्तू आहे म्हणून त्यांनी कुतूहलाने हाती घेऊन पाहिले. पण काही समजले नसल्याने ती पिशवी बाजुला फेकली. यावेळी सुदैवाने तो बॉम्ब फुटला नाही. मजुरांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी कामावर हजर असलेल्या ग्राम रोजगार सेवकाला सांगितले. त्याला बॉम्बची शंका आल्याने लगेच पोलिसांना माहिती दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, देसाईगंज ठाण्याचे निरीक्षक मांडवकर, तहसीलदार सोनवणे, गटविकास अधिकारी संगीता भांगरे आदी घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बशोधक-नाशक पथकालाही गडचिरोलीवरून पाचारण करण्यात आले आहे.