रस्त्यातील अपघातग्रस्तांना अजितदादांनी दिला मदतीचा हात

0
14

गोंदिया,दि.24- भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार मधुकर कुकडे यांच्या प्रचारासाठी दौऱ्यावर असलेले माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रस्त्यावर अपघात होऊन पडून असलेल्या जखमींना मदतीचा हात देत आपल्या गाडीतून उपचारासाठी रवाना केले. परिणामी, या घटनेमुळे अजितदादा पवार आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांचेप्रती नागरिकांनी आभार व्यक्त केले.

सविस्तर असे की, सध्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी दोन्ही जिल्ह्यात सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार मधुकर कुकडे यांनी विजय मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अनिल देशमुख हे प्रचार दौऱ्यावर आहेत. ते भंडारा तुमसर मार्गे पुढील प्रचारासाठी तिरोड्याच्या दिशेने जात असताना सरांडा नाल्यानजीक चारचाकी वाहनाचे अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपले वाहन थांबविले.त्या वाहनातून अपघातग्रस्तांना बाहेर काढून उपचारासाठी श्री पवार आणि देशमुख यांनी आपल्या वाहनाने तिरोडा येथे उपचारासाठी रवाना केले.गोंदिया येथील निलेश उके यांच्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी भंडारा येथे गेलेल्या मित्रांच्या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सराडी नाल्यानजीक उभ्या असलेल्या ट्रकला इंडिकाने धडक दिली.यात वाहनातील वाहनचालक मनिष मेश्राम(कुडवा) आणि वाहनातील प्रवासी रवी चौधरी,वैभव बनसोड,शुभम ढोमणे व विवेक शेंडे (सर्व.राहणारा खापर्डे काॅलनी गोंदिया)हे जखमी झाले.याच अपघातात मोटारसायकल सुध्दा वाहनात आल्याने मोटारसायकलस्वार तिरोडा तालुक्यातील चांदोरी निवासी कार्तिक नरुले व सौरभ दाभाडे हे सुध्दा जखमी झाले.या सर्व जखमींना पवार व देशमुख यांच्या ताफ्यातील वाहनाने तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.त्यानंतर त्या सर्वांना शासकीय वैद्यकिय महाविद्याल व केटीएस जिल्हा रुग्णालय गोंदियात हलविण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतरच घटनास्थळावरून अजित पवार व अनिल देशमुख यांनी प्रचारसभेसाठी प्रस्थान केले.प्रचारसभेत आल्यानंतर आयोजित प्रचार सभेत उपस्थित मतदारांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.