एच पी गॅस एजंसी देवरीची ग्राहकांनी केली तोडफोड

0
11
देवरी :दि.२५ः- येथील गॅस एजंसीच्या असंतोषजनक कारभारामुळे आणि सिलेंडर वितरणातील भ्रष्टाचारामुळे ग्राहकांच्या मनात खूप दिवसापासून असलेल्या असंतोषाचा भडका आज उडाला. परिणामी, वारंवार चकरा मारून सुद्धा सिलेंडर न मिळाल्याचा राग एजंसीतील सामानाची तोडफोड काही ग्राहकांनी केल्याची घटना आज अकरा वाजेतच्या सुमारास स्थानिक देवरी फ्लेम गॅस एजंशी मध्ये घडली.
देवरी तालुक्यातील जनतेला स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करण्यासाठी देवरी येथे एचपी कंपनीची एजंशी आहे. एकच वितरक असल्याने येथे नेहमी ग्राहंकांची वर्दळ असते. काही ग्राहकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, सदर गॅस एजंशीतून शहरातील धनदांडग्यांना घरपोच गॅसचे सिलेंडर पोचते केले जातात. गॅस सिलेंडरच्या देवरी येथे येणाऱ्या खेपेतून अर्धेअधिक सिलेंडरांची आधीच विल्हेवाट लावली जात असल्चाया आरोप नित्याचीच बाब बनली आहे. या सिलेंडर मधील गॅस इतर सिलेंडर मध्ये ट्रान्सफर करून त्याचा वाणिज्यिक वापर होत असल्याची सुद्धा शहरात चर्चा आहे. यामुळे शहरातील गरीब ग्राहक आणि ग्रामीण भागातून वेळ आणि पैशा खर्च करून येणाऱ्या ग्राहकाला अनेकदा येथे अपमानास्पद वागणुकीला सामोरे जाऊन रिकाम्या हाताने परतावे लागते.
याशिवाय चिचगड आणि सालेकसा येथील गॅस एजंशी ग्राहकांना घरपोच सिलेंडर सेवा पुरवित असताना देवरी फ्लेममध्ये सिलेंडरचे ट्रान्सपोर्टचे चार्जेच घेऊन त्यांना गोडाऊनमध्ये सिलेंडरसाठी रांगा लावून ताटकळत ठेवले जाते. याची अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधी, नेते, व्यापारी आणि अधिकाऱ्यांना घरपोच सिलेंडर मिळत असल्याने गरीब ग्राहकांचे होणारे हाल दुर्लक्षित करणे ही, नित्याचीच बाब आहे.
आज घडलेली घटना ही प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शासनाने अन्य दुसऱ्या गॅस एजन्सीची व्यवस्था करण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.