मुख्य बातम्या:

परिनिरीक्षण मंडळ सदस्यपदी नूतन धवने यांची नियुक्ती

चंद्रपूर,दि.26ः-राज्य शासनाच्या महाराष्ट्र रंगभुमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना दिनांक २२ मे रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली असुन या मंडळाच्या सदस्यपदी चंद्रपूरच्या रंगकर्मी नूतन धवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी आणि डॉ. जयश्री कापसे गावंडे यांची मंडळाच्या सदस्यपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
रंगमंचावर सादर होणा-या प्रयोगाच्या संहितांचे पुर्वपरिक्षण करण्यासाठी रंगभुमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कार्यरत आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अरूण नलावडे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील 3 वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. मंडळावर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सदस्या नूतन धवने या प्रसिध्द नाटय अभिनेत्री असुन शासनाच्या राज्य नाटय स्पर्धेच्या प्राथमिक तसेच अंतीम फेरीमध्ये उत्कृष्ट अभिनयाची सलग ६ रौप्य पदके त्यांनी पटकाविली आहेत. कामगार राज्य नाटय स्पर्धेतही त्यांनी अनेक पारितोषीके पटकाविली आहे. चंद्रपूरच्या नवोदिता या संस्थेच्या त्या सदस्या आहेत. नाटय क्षेत्रातील उल्लेखनिय कामगीरी बददल त्यांना अनेक सन्मानही मिळाले आहेत. महाराष्ट्र रंगभुमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर नूतन धवने यांच्या नियुक्तीबद्दल तसेच श्रीपाद जोशी आणि डॉ. जयश्री कापसे गावंडे यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल चंद्रपूरातील सांस्कृतिक वतुर्ळात आनंद व्यक्त होत असुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Share