देवरीत ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना मारहाण

0
8

देवरी,दि.26 – स्थानिक ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याची घटना काल रात्री( दि.25) सव्वा आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद देवरी पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सविस्तर असे की, नजिकच्या धोबीसराड येथील छत्रपती गौतम आकरे या पायाने जखमी झालेल्या युवकाला घेऊन त्याचे नातेवाईक स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी आले. रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यावेळी छत्रपतीवर उपचार करण्यासाठी एकही वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात हजर नव्हता. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना संताप आला. रुग्णालयात या घटनेला घेऊन गोंधळ वाढल्यानंतर तेथे डॉ. नितेश सिंह उपस्थित झाले. डॉ. सिंग यांच्याशी रुग्णाचा भाऊ सम्राट गौतम आकरे यांच्या शाब्दिक चकमक झाली. यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करण्यासाठी गोंदियाला नेण्याचा सल्ला दिला.
याउलट वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, रुग्णाचे नातेवाईक हे दारूच्या नशेत रुग्णाला घेऊन आल्याचे म्हटले आहे. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉ. सिंग यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोंदियाला नेण्याचा सल्ला देऊन ते लघुशंकेसाठी निघून गेले. दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाला गोंदियाला न नेता रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरवात केली. रुग्णाचा भाऊ सम्राट याने तेथे कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि परिचारिकांनी शिव्या देण्यास सुरवात केली. तेवढ्यात डॉ. सिंग हे पुन्हा रुग्णालयात येताच त्यांना सम्राटने बाहेर अडवून शिवीगाळ करून मारहाण केल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची देवरी पोलिसांनी अप.क्र. 138/18 अंतर्गत भादंविच्या  353,294,504आणि 506 कलमाखाली गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.