17 लाख 59 हजार 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्क –जिल्हाधिकारी काळे

0
7

 2149 मतदान केंद्रावर मतदान ; प्रथमच होणार व्हिव्हिपॅटचा वापर
 11 हजार 700 कर्मचारी नियुक्त
 चोख पोलीस बंदोबस्त
भंडारा, दि. 26 :- भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सोमवार 28 मे 2018 रोजी होणाऱ्या मतदानात भंडारा-गोंदिया जिल्हयातील 17 लाख 59 हजार 977 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2149 मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी 4728 बॅलेट युनिट, 2366 कंट्रोल युनिट व 2724 व्हिव्हिपॅट वापरले जाणार आहेत. लोकसभा पोट निवडणूकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये व्हिव्हिपॅट विषयी उत्सुकता असणार आहे. या निवडणूकीत राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष व अपक्ष मिळून 18 उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक खर्च नोडल अधिकारी अशोक मातकर, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम व अधिकारी उपस्थित होते.
भंडारा-गोंदिया मतदार संघाच्या पोट निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने पुरेशे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. भंडारा जिल्हयात 1210 मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून 6655 अधिकारी कर्मचारी, 1909 पोलीस कर्मचारी व 5 तुकडया अतिरिक्त पोलीस बल नेमण्यात आले आहे. गोंदिया जिल्हयासाठी 939 मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे मिळून 5135 अधिकारी कर्मचारी, 1924 पोलीस कर्मचारी व 14 अतिरिक्त पोलीस दल तुकडया नेमण्यात आल्या आहेत. या सोबतच भंडारा-गोंदिया जिल्हयात असलेल्या 2149 मतदान केंद्रावर अनुक्रमे 140 व 103 असे एकूण 243 सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.