शासनाने जनतेचा केला विश्वासघात

0
15

गडचिरोली दि. 26 :-: भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन चार वर्षांच्या कालावधीत अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. आज २६ मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस आणि मित्रपक्ष विश्वासघात दिन पाळणार आहेत, माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी शुक्रवारी २५ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, महासचिव एजाज शेख, सोनटक्के, जितू मुनघाटे, रजनीकांत मोटघरे, सेवानिवृत्त उपमुख्याधिकारी पी.टी. मसराम, गावतुरे, तुळशीदास भोयर, दिवाकर निसार, मिलिंद बांगरे उपस्थित होते .पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आ. डॉ. उसेंडी म्हणाले,  भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी व फडणवीस सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी, सर्वसामान्यांना मोठे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर ही आश्वासने पूर्ण न करून जनतेची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला मागील चार वर्षांत न परवडणारा भाव दिला. त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात विविध मोठमोठे घोटाळे झाले आहेत. ते घोटाळे करणारे सरकारचेच लागेबांधे असल्याने ते पळून जाण्यास यशस्वी झाले, अशी टीका सुद्धा डॉ. उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँगेसच्या काळात १४८ डॉलर हा एक बॅरल कच्च्या तेलाचा भाव होता. त्यावेळी ६५ ते ७० रुपये दराने पेट्रोल मिळत होते. परंतु आज ९० डॉलर एक बॅरल असूनसुद्धा पेट्रोलच्या किमती वाढून ८४ रुपये लिटर दर झाला आहे. या किमती वाढवून सरकारने जनतेची मोठी लूट केली आहे. हे सरकार लुटारू असल्याचे उसेंडी म्हणाले. जीएसटीमुळे जिल्ह्यातील तेंदूपत्त्याचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकºयांपेक्षा विमा कंपन्यांनाच अधिक होत आहे. चार वर्षांपासून आदिवासी, ओबीसी व इतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेऊन अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. सरकारच्या निषेधार्थ उद्या २६ मे रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने ‘विश्वासघात दिन’ साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्ते व मित्र पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उसेंडी यांनी केले.