मुख्य बातम्या:

भंडारा- गोंदियाप्रकरणी राष्ट्रवादीची मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई,दि.27 – भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मागणी केल्यानंतर कृषीमंत्र्यांनी धानावर पडलेल्या तुडतुड्या रोगावर नुकसान भरपाई देण्याची कबुली दिली होती. परंतु मधल्या ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि आता भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू असताना गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मे २०१८ रोजी सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांना २६ ते २८ मे या कालावधीपासून ते १५ जुनपर्यंत शेतकºयांना नुकसानीची भरपाई वाटप करण्यासाठी पूर्णवेळ बँका सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नुकसान भरपाई देण्याचा निर्णय डिसेंबर २०१७ रोजीचा असताना त्याची अंमलबजावणी आचारसंहितेच्या काळात केली जात आहे. निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे, असे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अनेक ईव्हीएम मशिन्स या टेस्टिंगच्यावेळी दोषयुक्त आढळल्या असून या सर्व मशिन्स सुरत, गुजरात येथून मागविण्यात आल्या आहेत. तरी पोटनिवडणुकीत सुरत, गुजरात येथून आलेल्या मशिन्स न वापरता महाराष्ट्रातील उपलब्ध असलेल्या ईव्हीएम मशिन्सचा वापर करावा. या निवडणुकीमध्ये व्हीव्हीएमपीएटी मशिनच्या वापर करण्यात येणार आहे. अनेक व्हीव्हीएमपीएटी मशिन अत्यंत धीम्या गतीने चालणाऱ्या आहेत. मतदारांकरिता पावती महत्त्वाची आहे. तरी निकाल जाहीर करण्यापूर्वी व्हीव्हीपीएटी मशिनच्या पावत्यांचीही मोजणी करण्यात यावी, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Share