मुख्य बातम्या:

एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर,दि.27 :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (मेडिकल) एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने शनिवारी ‘मॅलिकीआॅन’ नावाचे विष प्राशन करून आत्महत्या केली. ई-लायब्ररीच्या पार्किंगच्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेला घेऊन मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे.अशवंत अशोकराव खोब्रागडे (२२) रा. भंडारा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
अशवंत हा २०१४ बॅचचा विद्यार्थी होता. महाविद्यालयाच्या वसतिगृहात न राहता हनुमाननगर येथे भाड्याच्या खोलीत राहायचा. सूत्रानूसार, अशवंत हा अभ्यासात बऱ्यापैकी होता. ई-लायब्ररीत तो नियमित अभ्यास करायला यायचा. त्याला खूप जवळचे असे मित्र नव्हते. तो नेहमी एकटा राहायचा. शनिवार २६ मे रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे ई-लायब्ररीत आला. काही वेळ तो ‘लायब्ररी’त बसला. मात्र, नंतर तो कुठे गेला कुणालाच कळले नाही. सायंकाळी जेव्हा काही विद्यार्थी ई-लायब्ररीच्या पार्किंगच्या ठिकाणी उभे होते तेव्हा त्यांना दूर काहीतरी पडून असल्याचे दिसून आले. जेव्हा जवळ जाऊन पाहिले तेव्हा अशवंतचा मृतदेह आढळून आला. काही अंतरावर पांढºया रंगाची विषाची बॉटलही पडून होती. विद्यार्थ्यांनी लागलीच वरिष्ठांना याची माहिती दिली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाय.व्ही. बन्सोड यांच्यासह अनेक अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. अभ्यासाच्या नैराश्यामधून त्याने हे पाऊल उचलले असावे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. अशवंतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास अजनी पोलीस करीत आहे.

Share