फेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल

0
9
नमाद महाविद्यालय मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर बोलतांना प्रफुल पटेल

गोंदिया,दि.28(खेमेंद्र कटरे)ः- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयोगासह सरकारला चांगलेच धारवेर धरले आहे. ‘महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं पुरेशी असताना ती सुरतहून का मागवण्यात आली,’ असा सवाल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच तक्रारीच्या माध्यमातून उपस्थित केला होता.त्याकडे निवडणुक आयोगासह जिल्हा निवडणुक अधिकारी व निवडणुक निरिक्षकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत  जिथे, जिथे ईव्हीएममध्ये घोळ झाला आहे तिथे फेरमतदान घेण्याची मागणी करीत फेरमतदान होईपर्यंत देशातील पोटनिवडणुकींचा निकाल थांबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व खासदार प्रफुल पटेल यांनी आज केली आहे. सोबतच उत्तरपद्रेशातही आज होत असलेल्या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनध्ये बिघाड येत असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच ठिकठिकाणांहून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. व्हीहीपॅटही व्यवस्थित मिळत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काही मतदान केंद्रावर मतदान स्थगित करण्यात आले. या संपूर्ण गोंधळासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी निवडणुक आयोग व सरकारला जबाबदार धरले आहे. ‘तापमान जास्त असल्यामुळं ईव्हीएम बंद पडत असल्याचे कारण धक्कादायक आहे. ही निवडणूक प्रक्रियेची थट्टाच आहे. एप्रिलमध्येही अनेकदा ४५ टक्के तापमान असते. म्हणजे उन्हाळ्यात निवडणुका घ्यायच्याच नाही का, असा प्रश्न पटेल यांनी केला. गोंदिया विधानसभा मतदारसंघातील 34 मतदान केंद्रावर मतदान थांबविण्यात आले असून त्याठिकाणी कधी फेरमतदान होणार हे निवडणुक आयोगावर अवलंबून असल्याचे सांगत मतदारांना मात्र निवडणुक विभागाच्या गोंधळामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची टिका व्यक्त केली.

‘ज्या ठिकाणी मशीन बंद पडले, तिथं फेरमतदान घेण्यात यावे. तोपर्यंत देशातील कुठल्याही पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी करू नये, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असे मत त्यांनी मांडले. मतपत्रिकेमुळं निवडणूक प्रक्रिया लांबेल. निकालाला उशीर लागेल, अशी कारणे दिली जात आहेत. पण ही कारणे काही शोभणारी नाहीत.अमेरिकेतही दोन-तीन दिवस मतमोजणी सुरू असते.आपल्याकडेही आधी मतपत्रिकेनेच मतदान व्हायये.प्रगतशील देशांनी ईव्हीएम नाकारून मतपत्रिकेचा मार्ग स्विकारला आहे.त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुन्हा यामुद्यावर एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत आपल्याकडे निकाल उशीर लागला तर असे काय आभाळ कोसळणार आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

त्या दिवशी सुट्टी जाहीर करा 
ईव्हीएम आणि व्हीव्हीटीपॅट मशीन मधील बिघाडामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३४ मतदार केंद्राचे मतदान थांबविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान होणार आहे. यामुळे मतदान करण्यासाठी गेलेल्या शेकडो मतदारांना मतदान न करताच परत जावे लागले. तर ज्या दिवशी या मतदान केंदावर फेर मतदान घेण्यात येईल, त्या दिवशी प्रशासनाने सुट्टी जाहीर करावी. अन्यथा त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे खा.प्रफुल पटेल यांनी सांगितले.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा 
सुरत येथून मागविण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनवर आम्ही सुरूवातीपासून आक्षेप घेतला होता. त्याची रितसर तक्रार सुध्दा मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. वांरवार ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच निवडणूक आचार संहिता लागू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळ निधीचे पैसे वाटप करण्यासाठी बँका सुरू ठेवण्याचे आदेश काढले होते. मात्र आम्ही तक्रार केल्यानंतर ते परत घेतले. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पटेल यांनी केली.

प्रफुल पटेल यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

  • प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ६० पर्यंत मशीन्स बंद पडल्या
  • ज्या मशीन्स मध्ये मतदान झाले त्या सुरक्षित राहतील असे कसे मानायचे ?
  • मशीन्स खराब होत राहिल्या तर निवडणूका गंमत होउन जातील
  • व्हीव्हीपॅट मध्ये जेवढ्या चिठ्ठीमध्ये काय छापलंय ते पहाव लागेल
  • अखिलेश यादव यांचा फोन आला, कैराना मधील ३०० मशीन्स उत्तर प्रदेश मध्ये  खराब झाल्याचं सांगितलं आहे
  • परदेशा प्रमाणे बॅलेट वापरण्यावर पुन्हा एकदा विचार करावा
  • जो पर्यंत सर्व मशीन्स मधून पुन्हा मतदान होत नाही तो पर्यंत कुठलाही निकाल लावू नये
  • वीस ते पंचवीस टक्के मशीन्स बंद झाल्या आहेत