सीबीएसईमध्ये मुलींनी मारली बाजी

0
8

गोंदिया,दि.30 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२९) जाहीर झाला. या परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र होते. विवेक मंदिर स्कूलची विद्यार्थिनी महिमा अग्रवाल ९६.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावितानाच विवेक मंदिर स्कूलच्या विद्यार्थ्यांनीच द्वितीय व तृतीय क्रमांकही पटकाविला आहे. स्कूलमधील कणिका विमलेश अग्रवाल हिने ९६.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून द्वितीय तर रिषभ जैन याने ९६.४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सोबतच येथील गोंदिया पब्लिक स्कूलची योगप्रिया चौधरी हिने ९५.६० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. साकेत पब्लिक स्कूलचा विद्यार्थी तोषीक पारधी याने ९३.८ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. तर सेंट झेवियर्स स्कूलमधून परिधी सिंघल हिने ९५.२ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सीबीएसई परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये याबाबत उत्स्कुता होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास निकाल जाहीर झाला. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकासह शाळेत पोहचत निकाल जाणून घेतला. सीबीएसई निकालाच्या टक्केवारी सुध्दा मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या. निकाल हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेसमोर आनंद साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.