‘ऑनलाईन’ बदली प्रक्रियेत पुन्हा शिक्षकांत गोंधळ!

0
17

गोंदिया दि.६ : राज्य शासनाने शिक्षक बदली प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रक्रियेचे धोरण अवलंबिले आहे. ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या नियंत्रणाखाली होत आहे. आजघडीला बदली प्रक्रियेतील ५ फेर्‍या झाल्या आहेत. यानंतर २३९ शिक्षक विस्थापित ठरले आहेत. तर दुसरीकडे तेवढय़ा रिक्त जागा दिसून येत नाहीत. त्यामुळे शिक्षकांमध्ये पुन्हा एकच गोंधळ उडाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाची अनियोजनबद्ध बदली प्रक्रिया आहे, असा आरोप करीत शिक्षकांनी एकवटून समानीकरण जागा रिक्त करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी शासनाने ऑनलाईन धोरण अवलंबून शिक्षकांनी २0 ऐच्छिक ठिकाण नमूद करून अर्ज मागविले होते. भाषा, समाजशास्त्र, गणित या विषयानुरुप रिक्त जागांच्या अनुषंगाने फेरीनिहाय बदली प्रक्रिया ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. गोंदिया जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेचे ५ फेर्‍या उरकल्या आहेत. पाचव्या फेरीअंती जिल्ह्यात गोंदिया पं.स.अंतर्गत १0३, तिरोडा २६, आमगाव १८, अजुर्नी मोरगाव ३३, सडक अर्जुनी १९, गोरेगाव २६, देवरी ८, सालेकसा ६ असे एकूण २३९ शिक्षक विस्थापित ठरले आहेत. यानुरुप तेवढय़ा प्रमाणात रिक्तपदांची संख्या दिसून येत नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये पुन्हा बदली प्रक्रियेला घेऊन एकच गोंधळ निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली नाही. ज्या शिक्षकांनी ऐच्छिक जागा नमूद केल्या आहेत, त्या जागा रिक्त असूनही त्या ऑनलाईनमध्ये दाखविण्यात आल्या नाहीत. मराठी भाषा शिक्षकांची हिंदी शाळेत बदली करण्यात आली आहे. एकूणच गोंधळ घालणारा प्रकार अवलंबून जि.प. प्रशासन शिक्षकांच्या बदल्या करीत आहे, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. या अन्यायकारक बदली प्रक्रियेला थांबविण्यासाठी शिक्षकांच्या संघटना एकवटल्या आहेत. आज (ता.५) समानीकरण जागा रिक्त करण्याच्या प्रमुख मागणीला घेऊन सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुखांनी जिल्हा परिषदेचे सीईओ यांना निवेदन दिले आहे. यामुळे यंदाही शिक्षकांची बदली प्रक्रिया रखडणार तर नाही, याकडे शिक्षकांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
निवेदन देतेवेळी वीरेंद्र कटरे, अयुब खान, किशोर डोंगरवार, एल.यू. खोब्रागडे, अनिरूद्ध मेर्शाम, एस.यू. वंजारी, दिलीप नवखरे, उमेदलाल हरिणखडे, रिता बांते, गौतम बांते, लालसिंग हिरापुरे, संतोष बिसेन, खिलेश्‍वरी भगत, डुमेश्‍वरी शेंद्रे आदी शिक्षक उपस्थित होते.