दहावीचा निकाल 8 जूनला

0
4

पुणे,दि. 7- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
मागील काही दिवसांपासून दहावी निकालाबाबत सोशल मिडियावर विविध तारखा व्हायरल होत होत्या. अखेर मंडळाने शुक्रवारी निकाल लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले. परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण तीनपैकी कोणत्याही संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या निकालाची विद्यार्थ्यांना प्रिंट घेता येईल. तसेच हा निकाल एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवरही उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

शनिवारपासून गुण पडताळणी
ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना शनिवार (दि. ९) पासून गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरता येईल. गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह ९ ते १८ जून या कालावधीत अर्ज करता येईल. तर ९ ते २८ जूनदरम्यान उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करावा लागेल.
पुनर्मूल्यांकनाची सुविधा
उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. ही छायाप्रत मिळाल्यानंतर दुस-या दिवसापासून पुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसात संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागेल. विभागीय मंडळाकडे याविषयीची अधिक माहिती मिळेल.
श्रेणीसुधारची संधी
मार्च २०१८ परीक्षेमध्ये सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी दोन संधी दिल्या जाणार आहेत. त्यानुसार जुलै-ऑगस्ट २०१८ व मार्च २०१९ मध्ये होणा-या परीक्षा देता येतील. श्रेणी किंवा गुणसुधार योजना २००८ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या वेबसाइटवर पाहता येणार निकाल

  • www.mahresult.nic.in
  • www.result.mkcl.org
  • www.maharashtraeducation.com
  • www.rediff.com/exams
  • https://maharashtra10.jagranjosh.com