नियमबाह्य शुल्क वसुली करणाऱ्या शिक्षण संस्थांविरुद्ध कारवाईसाठी टास्क फोर्स- मुख्यमंत्री

0
10

मुंबई : विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच त्यांच्याकडून नियमबाह्य शैक्षणिक शुल्क वसुल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत शैक्षणिक संस्थांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीश राजे आत्राम, अपर मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, उपसचिव एस.एन. सरकुंडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत शिक्षण संस्थांनी जागरुक असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आश्रमशाळा व निवासी संस्था यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच निवास, भोजन, आरोग्य आदींबाबत जागरुक राहून चांगल्या दर्जांच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.