पवनीची साक्षी घावळे भंडारा जिल्ह्यात प्रथम

0
16

भंडारा,दि.09ः-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित केला. यावेळी नागपूर विभागातून भंडारा जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर राहिला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८६.६४ टक्के लागला आहे. याहीवर्षी मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९0.५१ आहे. पवनी येथील वैनगंगा विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी सुनील घावळे हिने ९७.८0 टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तिला ४८९ गुण मिळालेले आहेत. कला/खेळसाठी तिला अतिरिक्त ७ गुण मिळाले असल्याने तिच्या गुणांची टक्केवारी ९९.२0 इतकी आहे.यावर्षी जिल्ह्यातून १९ हजार १२0 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी १९ हजार ५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १६ हजार ५0८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८३.११ तर मुलींची ९0.५१ आहे.
जिल्ह्याच्या निकालात लाखनी तालुका अव्वल ठरला असून पवनी तालुका माघारला आहे. लाखनी तालुक्याचा निकाल ८९.८९ टक्के, भंडारा तालुका ८८.३१ टक्के, लाखांदूर तालुका ८८.८७ टक्के, मोहाडी तालुका ८५.0३ टक्के, पवनी तालुका ८४.३४ टक्के, साकोली तालुका ८६.९१ टक्के तर तुमसर तालुक्याचा निकाल ८४.४५ टक्के लागला आहे.

१६ शाळेचा निकाल शंभर टक्के
भंडारा जिल्ह्यातील १६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात आयुध निर्माणी सेंकडरी स्कूल जवाहरनगर, जेसीस इंग्लिश हायस्कूल भंडारा, शंशाक माध्यमिक विद्यालय कवडसी, अंकुर विद्यालय भंडारा, अनुसूचित जाती नवबौद्ध मुलीची शाळा, युनायटेड कॉन्व्हेंट ठाणा (जवाहरनगर), गंगाबाई हायस्कूल चप्राड, बुराडे हायस्कूल डांभेविरली, विद्याविहार मंदिर लाखांदूर, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मासळ, लोक विद्यालय पांढराबोडी, पवन पब्लिक स्कूल पवनी, महात्मा गांधी हायस्कूल बाम्पेवाडा, कृष्णमुरारी कटकवार हायस्कूल साकोली, इंग्लिश मीडियम हायस्कूल तुमसर, प्रगती केंद्रीय अनूसूचित जाती माध्यमिक निवासी शाळा बपेरा यांचा समावेश आहे. आठ दिवसांपूर्वी जाहिर झालेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २६ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला होता. दहावीच्या २८६ आणि बारावीच्या १५४ शाळांच्या तुलनेत शंभर टक्के निकालाच्या शाळांमध्ये बारावीचा निकाल सरस ठरला आहे.
निकालात लाखनी तालुका अव्वल
दहावीच्या निकालात लाखनी तालुक्याचा ८९.८९ टक्के निकाल सर्वाधिक राहिला. लाखनी तालुक्यातील २५ शाळेतून १ हजार ५९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ७९१ मुले आणि ६४० मुली असे १,४३१ विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले. मुलांची टक्केवारी ८७.७९ इतकी असून मुलींची टक्केवारी ९२.६२ इतकी आहे. पवनी तालुक्याचा निकाल ८४.३४ टक्के लागला असून हा निकाल जिल्ह्यात सातव्या स्थानावर आहे.
मुलींनीच मारली बाजी
बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलींनी आघाडी घेतली आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार ९७९ मुले आणि ९ हजार ७५ मुलींनी परीक्षा दिली. यात ८ हजार २९४ (८३.११ टक्के) मुले ऊत्तीर्ण झाले तर ८ हजार २१४ (९०.५१ टक्के) मुली ऊत्तीर्ण झाले आहेत.