जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिनानिमित्त चर्चासत्र 15 जून रोजी

0
16

मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) ः 15 जून या जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिनानिमित्त समाजात जागृती व्हावी यासाठी 15 जून रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि हेल्पेज इंडिया संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे दुपारी 3 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या चर्चा सत्रात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा समजून घ्याव्यात असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिनानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचा आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांना माहिती देत होते. ते म्हणाले की, आजच्या काळात तरूणांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे व्यस्त असलेल्या समाजात ज्येष्ठांच्या साध्या साध्या गरजांकडेही दुर्लक्ष केले जाते. विभक्त कुटूंब पध्दतीमुळेही ज्येष्ठांविषयीचा आदर बालवयातच कमी होत आहे.  ज्येष्ठाविषयीची आस्था कमी होत असल्यामुळेही त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. जागतीक पातळीवरही ही आकडेवारी वाढत असल्याबाबत बडोले यांनी चिंता व्यक्त केली.
ज्येष्ठांना वृध्दाश्रमात ठेऊन त्यांच्या संपत्तीवर दावा करणारे काही महाभाग, आणि मुलांनी आपला वृध्दापकाळात सांभाळ करावा म्हणून कोर्टात याचना करताना पाहिले की, मन हेलावून जाते.  आपला समाज कुठे चालला हेच कळत नाही. आपणही एक दिवस या अवस्थेतून  जाणार आहोत, याचे भान तरूण पिढीने ठेवण्याची आवश्यकता आहे. बाल संस्कार आणि शैक्षणिक साहित्यातून मुलांच्या मनात ज्येष्ठांविषयी प्रेम, आदर आणि कणव निर्माण केली तर पुढच्या काळात कोणत्याही ज्येष्ठावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होणार नाहीत, असा ठाम विश्वास बडोले यांनी यावेळी व्यक्त करून अशा चर्चासत्रात तरूणांनी उपस्थित राहून आपल्या ज्येष्ठांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात असे आवाहन केले