परीक्षार्थीनींकडून ६ हजाराची लाच मागण्याप्रकरणी पर्यवेक्षक ताब्यात

0
8

अकोला, दि.१४ः:जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगावात असलेल्या डॉ.नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी महिला नऊ महिन्याची गरोदर असल्यामुळे तिला विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चढणे शक्य नव्हते. म्हणून तिने केंद्रावरील पर्यवेक्षक नरेश गुलाबराव कराळे याला वरच्या मजल्याऐवजी खालच्या मजल्यावर बसून पेपर सोडू देण्याची विनंती केली असता पर्यवेक्षकाने याकरिता परिक्षार्थीला 6000 रुपये मागणी केली. मात्र परीक्षार्थी महिलेला लाचेची रक्कम द्यावयाची नसल्याने तिने अकोला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची खात्री करून लाचखोर पर्यवेक्षकाला जाळ्यात अडकविण्यासाठी सापळा रचला, परंतू आरोपीस संशयाचे भास झाल्याने त्याने लाचेचे रक्कम स्वीकारली नाही. पडताळणी दरम्यान लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नरेश गुलाबराव कराळे याला अटक केली आहे.
आरोपी नरेश गुलाबराव कराळे, वय ३८ वर्षे, पद-वरिष्ठ बहिस्थ परीक्षक, डॉ.नानासाहेब चिंचोळकर उच्च माध्यमिक विद्यालय, वाडेगाव ता.बाळापूर जि.अकोला.मूळ नेमणूक निमंत्रक अनुदानित अध्यापक विद्यालय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ दारव्हा जि.यवतमाळ रा.कुपती, पो.झोडगा, ता.कारंजा,जि.वाशीम.येथील राहणार आहे.
या प्रकरणातील तक्रारकर्ती महिला ९ व्या महिन्यातील गरोदर असून बीए प्रथम व द्वितीय वर्षाचे पेपर नानासाहेब चिंचोळकर उच्च माध्यमिक विद्यालय वाडेगाव ता बाळापूर जि.अकोला या परीक्षा केंद्रावर दि. २५ में २०१८ पासून परीक्षा देत आहे. तिचा परीक्षा क्रमांक तिसऱ्या मजल्यावर आला असल्याने ती नऊ व्या महिन्याची गरोदर असल्याने तक्रारकर्तीने आरोपीस खालील मजल्यावर बसू देण्याची विनंती केली होती. याकरिता आरोपीने सर्व पेपरला खाली बसू देण्यासाठी विद्यार्थिनींकडून ६००० रुपयांची मागणी केल्याचे पडताळणी मध्ये निष्पन्न झाले. आरोपीस अटक करण्यात आली आहे. हि कारवाई संजय गोर्ले पोलीस उपअधिक्षक व ईश्वर चव्हाण, पोलीस निरीक्षक यांनी केली असुन या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे व पुढील चौकशी सुरू आहे.