पंचम बिसेन गोंदियाचे तर नाना पंचबुध्दे भंडारा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष

0
51

गोंदिया दि.१४ः: राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भातील बहुतांश जुन्या जिल्हाध्यक्षांवरच विश्‍वास कायम ठेवला असून मधुकर कुकडे खासदार झाल्यामुळे भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्षपद नाना पंचबुद्धे व गोंदियाचे जिल्हाध्यक्षपद पंचम बिसेन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्षांची यादी आज जाहिर केली आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यातील जुन्या जिल्हाध्यक्षांवरच राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला विश्वास ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भातील अमरावती शहर व ग्रामीण, वर्धा, नागपूर शहर, भंडारा व गोंदिया जिल्हाध्यक्षांची नियुक्ती गुरुवारी जाहीर करण्यात आली. यात भंडारा व गोंदिया जिल्हाध्यक्ष वगळता जुन्या जिल्हाध्यक्षांना कायम ठेवण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भंडारा जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळे त्यांच्याकडून हा पदभार काढून घेतला आहे. त्यांच्याऐवजी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली आहे.पंचबुध्दे हे कुणबी समाजातील नेते आहेत.भंडारा जिल्ह्यात कुणबी समाजाकडे तर गोंदिया जिल्ह्यात पोवार समाजाकडे अध्यक्षपद ठेवत राष्ट्रवादीने जातीय समीकरणाला टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले आहे. गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विश्‍वासातील माजी जि.प.सभापती पंचम बिसेन यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून विनोद हरिणखेडे हे अध्यक्षपदावर होते.त्यातच लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांच्याच गावात कुकडे यांना मिळालेली कमी मते आदी काही कारणे दूर करण्यासाठी बिसेन यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय अमरावती (शहर) राजेंद्र महल्ले व ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद सुनील वऱ्हाडे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.  वर्धा जिल्हाध्यक्षपद सुनील राऊत यांच्याकडे राहणार आहे. नागपूर शहराध्यक्षांबद्दल सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असतानाही अनिल अहीरकर यांना कायम ठेवण्यात आल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अहीरकर उद्योजक म्हणून प्रसिद्ध असल्याने ते संघटनेसाठी जास्त वेळ देऊ शकत नाही, अशा तक्रारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहीरकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे.