विधिमंडळाचे सचिवालय २२ पासून नागपुरात;४ जुलैपासून अधिवेशन

0
13

नागपूर दि.१४ः:: येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने येत्या २२ जूनपासून विधिमंडळ सचिवालय नागपुरात स्थलांतरित होणार आहे, तेव्हा पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा, असे निर्देश विधानमंडळ सचिवालयचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी गुरुवारी दिले. विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीसाठी सर्व विभागाने समन्वयाने काम करून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन ४ जुलैपासून विधानभवन, नागपूर येथे सुरू होणार आहे. या अनुषंगाने विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्री परिषद दालन कक्षात विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत विभागीय आयुक्त अनुप कुमार, उपसचिव विलास आठवले, सभापती सचिव म.मु काज, अवर सचिव रवींद्र जगदाळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल,पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे, कक्ष अधिकारी तथा मालमत्ता व्यवस्थापक मधुकर भडेकर,पद्धती विश्लेषक अजय सरवणकर, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, रेल्वे, भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड, महानगरपालिकेसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.तत्पूर्वी कळसे यांनी विधानसभा, विधान परिषद सभागृह तसेच रविभवन, आमदार निवास, १६० खोल्याचे गाळे यांची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीबाबत सूचना केल्यात.

वाहन व्यवस्थेबाबत विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले की, अधिवेशन कालखंडात २०० कार तसेच २०० जीप असे एकूण ४०० अतिरिक्त खासगी वाहनाची व्यवस्था केली आहे. मनुष्यबळाची संख्या अधिक असल्याने यावर्षी पहिल्यांदा ‘ग्रीन ओला’ अ‍ॅप बेस सर्व्हिसचा उपयोग करण्यात येणार आहे. यासाठी ‘ओला’च्या १०० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय १०० टॅक्सी देखील उपलब्ध राहणार आहेत. राज्यभरातून येणाऱ्यां ६२०० पोलीस अधिकारी व कर्मचा ऱ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था मंगल कार्यालये, सरपंच भवन अशा विविध ठिकाणी करण्यात आली आहे.
विधिमंडळात २७१ दूरध्वनी संच लावण्यात येणार आहेत. याशिवाय एअर लाईनच्या माध्यमातून अतिरिक्त इंटरनेट सुविधा तसेच दूरध्वनी व्यवस्था करण्यात येणार आहे. विधिमंडळाचे कामकाज आॅनलाईन पद्धतीने चालणार असल्याने पावसाळ्यामुळे दूरध्वनी तसेच इंटरनेट सुविधेत कुठलाही अडथळा राहू नये यासाठी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी केल्या.