विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता बायोमेट्रीक पद्धतीने होणार

0
13

मुंबई, दि.१६ : : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात अशा अनेक तक्रारी येत होत्या. तसेच विधीमंडळ सदस्यांनी वेळोवेळी सभागृहात याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्री‍क पध्दतीने सुरु करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/अंशत: अनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविदयालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती यापुढे बायोमेट्रिक पध्दतीने घेण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या पाच विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने घेण्यात येईल.
बायोमेट्रिक उपस्थिती सुरु करण्याकरिता आवश्यक असणारी यंत्रसामुग्री येत्या एक महिन्यात कनिष्ठ महाविद्यालयांनी स्वत: उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे. तसेच माध्यमिकचे संबंधित शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांनी सदर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक पध्दत सुरु झाली आहे किंवा कसे याबाबत अहवाल शासनास देणे आवश्यक असणार आहे.