वृद्धाचा गळा आवळून खून; मृतदेह लोणार अभयारण्य परिसरात फेकला

0
22

बुल़ढाणा,दि.16ः- सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील एका 72 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा गळा आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शहराच्या बाजुला लोणार मंठा रस्त्यालगत असलेल्या अभयारण्य परिसरात फेकून दिला. ही घटना आज (ता.16) रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, ठाणेदार राजेंद्र माळी यांनी वेगाने तपासचक्र फिरवून अवघ्या काही तासातच मृतकाची ओळख पटवली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील मारोती पांडू गाडगे, (वय-72) हे 15 जून रोजी दुपारी चार वाजेपर्यंत सवडद येथे होते. तर सायंकाळी सहा वाजता ते साखरखेर्डा येथे असल्याचे काही नातेवाइकांनी बघितले. मात्र, त्यांचा मृतदेह शहरानजीक सरोवराच्या बाजूला असलेल्या लोणार मंठा रस्त्याजवळ मुलतानी या परिसरात रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. या वेळी वाहतूक शाखेचे गजानन बनसोड यांनी सदर मृतदेह बघितला. त्यानंतर या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.

माहिती मिळताच ठाणेदार राजेंद्र माळी, पीएसआय ज्ञानेश्वर थोरात यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. त्यावेळी मृतकाच्या खिशामध्ये 14 जून रोजी मृतकाने बुलडाणा ते लव्हाळा प्रवास केल्याचे एसटीचे तिकीट मिळून आले. त्यानंतर ठाणेदार राजेंद्र माळी, पीएसआय ज्ञानेश्वर थोरात यांनी तपासचक्र वेगात फिरवत मृतकाची ओळख पटवून या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाइकांना दिली. नातेवाइकांनी मृतकाची ओळख पटल्यानंतर मृतदेह वैद्यकीय उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. हा खून नेमका कशामुळे झाला, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. मृतकाचा शेतजमिनीचा वाद न्यायालयात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बुलडाणा येथून ठसे तज्ञ राजेश बच्छीरे व त्याची चमू दाखल झाली असून, त्यांनी मृतदेहाची तपासणी केली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी भेट देऊन पोलिस प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या समवेत पीएसआय भालेराव उपस्थित होते. प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ज्ञानेश्वर थोरात, सहायक पोलिस उपनिरीक्षक उकंडराव राठोड, पोहेकॉ चाटे, राम गीते, चंद्रशेखर मुरडकर, सुधाकर काळे, चालक ठाकरे हे करत आहेत.