दोन गणवेशासाठी आता मिळणार ६00 रुपये!

0
21

गोंदिया,दि.19ः-समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. या गणवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास २00 रुपये याप्रमाणे दोन गणवेशाचे ४00 रुपये त्याच्या खात्यात जमा करण्यात येतात. ४00 रूपयांत दोन गणवेश हे समीकरण आजच्या परिस्थितीत कमी दर्जाचे असून गणवेशाचा दर्जा उंचवावा म्हणून एका गणवेशामागे १00 रुपयांनी वाढ करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यावर आता ४00 ऐवजी ६00 रुपये जमा केले जाणार आहेत. याचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
आजच्या परिस्थितीत २00 रुपयांत शालेय गणवेश घेणे म्हणजेच कपड्यांच्या गुणवत्तेबरोबर तडजोड करणे आहे. शासनाकडून मिळणार्‍या रकमेत वाढ करण्याची मागणी पालकांतून होती. या संदर्भात शासनाने १0 मे २0१८ च्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत विचारविनिमय करून शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता एका गणवेशामागे शंभर रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे ३00 रूपये याप्रमाणे दोन गणवेशासाठी आता ६00 रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश शासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत. यासंदर्भा विनाविलंब विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश देण्याचे आदेश समग्र शिक्षा अभियानाला देण्यात आला आहे. ही कार्यवाही तत्काळ पूर्ण केली जाणार असून नवीन गणवेशाची रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना खाते तसेच इतर कागदपत्रांची माहिती अपडेट करावी लागणार आहे.
यापूर्वी ही रक्कम शालेय समिती व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यात जमा केली जात होती. त्यामुळे एकत्रित गणवेश खरेदीतून विद्यार्थ्यांचा फायदा होता. रक्कम थेट खात्यात जमा होण्याच्या नव्या प्रक्रियेला मात्र अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यावर्षीही अनेक विद्यार्थ्यांची यादी अपडेट तर काहींचे बॅंक खाते उघडावे लागणार आहे.
जिल्हा परिषद शाळा तसेच नगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जमातीची मुले, बीपीएल मुले या सर्वांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश वाटप करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.