जेवनाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

0
16

भंडारा,दि.22 : पीक घेऊनही शेतमालाला भाव न मिळाल्याने आर्थिक स्थितीला कंटाळून ४८ वर्षीय शेतकºयाने थायमेट प्राशन करून आत्महत्या केली. गिरीधारी राजाराम गोंदोळे (४८) रा.जेवनाळा असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकिला आली.
गोंदोळे यांच्याकडे वडीलोपार्जीत दीड एकर जमीन असून या वर्षाला त्यांनी एका एकरात वांग्याचे पीक लावले. यात जीव ओतून वांग्याचे पीक घेतले. मात्र पिक हातात येताच भाव गडगडल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. भाव मिळण्याच्या आशेपोटी त्यांनी मेहनत व खर्च सुरुच ठेवला. पण अखेरपर्यंत वांग्याला भाव न मिळाल्यामुळे तो नेहमी हताश राहायचा. ही आपबिती लहान भाऊ ओमप्रकाश गोंदोळेला एकविली होती. निराशेतून त्यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतला असावा असे ओमप्रकाशने सांगितले. गुरुवारी दुपारी गोंदोळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, वडील व भाऊ आहे.