पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेकला लुधियानात अटक

0
12

नागपूर ,दि.22ः-एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक पालटकरला नागपुरच्या गुन्हे शाखा पथकाने लुधियानाच्या एका झोपडपट्टीतून अटक केली. त्याला शुक्रवारी विमानाने नागपुरला आणले जाईल.
१0 जूनच्या रात्री त्याने आराधनानगरात राहणारी बहिण अर्चना पवनकर, जावई कमलाकर पवनकर, अर्चनाची सासू मीराबाई, भाची वेदांती आणि स्वत:चा मुलगा कृष्णा यांची झोपेत असताना लोखंडी बत्त्याने हत्या केली होती. या हत्याकांडानंतर तो खरबीच्या चामट लॉनजवळील रमेश गिरीपुंजे यांच्या घरी भाड्याने घेतलेल्या खोलीत गेला. तेथे पूजा-पाठ केल्यानंतर पसार झाला होता. गुन्हे शाखा आणि नंदनवन पोलिसांसह दहा पथके त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी दुसरा मार्ग म्हणून विवेकशी संबंधित संपूर्ण माहितीसह फोटो व्हायरल केला होता. एवढेच काय तर त्याची माहिती देणार्‍याला योग्य बक्षीस देण्याची आणि त्याचे नाव गुप्त ठेवण्याची घोषणाही केली होती. मात्र, विवेकने वापरत असलेला मोबाईल बंद ठेवल्यामुळे त्याच्या लोकेशनचा काही थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान तो देशदर्शनाला गेला असावा, असाही अंदाज वर्तविण्यात आला होता. कारण २0१४ मध्ये पत्नीच्या हत्येनंतर तो वैष्णोदेविला दर्शनासाठी गेला होता. पोलिस त्याचा मोबाईल ट्रेसिंगवर लाऊन होतेच. दरम्यान विवेकने तीन दिवसांपूर्वीच मोबाईल सुरु केला. त्याने नवीन सीम खरेदी करुन जुन्या मोबाईलमध्ये घातला आणि आधी वापरीत असलेला मोबाईल बंदच ठेवला. मोबाईल सुरु करताच विवेकचे लोकेशन समजले. तो पंजाब जवळील लुधियानात असल्याचे समजताच एक पथक लुधियानाला गेले. तेथील एका झोपडपट्टीतून गुरुवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळल्या.