शिक्षकांच्या बदलीत पती-पत्नीतील अंतर झाले 50 ते 212 किमी

0
7

गोंदिया/नागपूर,दि.23 : शिक्षकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन केल्या. बदल्यांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप झाला नसल्याने ह्या बदल्या पारदर्शक झाल्याचे शासन सांगते. परंतु या बदल्यामुळे अनेक शिक्षकांच्या तक्रारी वाढल्या आहे. पतीपत्नी एकत्रीकरणाच्या निकषात अनेक दाम्पत्यांचे विभक्तीकरण झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार शिक्षक बदली शाळेत रुजू झाले आहे. परंतु शिक्षकांची मानसिकता गोठावली आहे. खरचं या बदल्या पारदर्शक की अन्यायकारक असा सवाल आता शिक्षकांकडून होत आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सुध्दा पती पत्नी एकत्रीकरणाला बगल देण्यात आले आहे.विस्थापित शिक्षकांच्या बदल्या करतांना स्थानिक पातळीवर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अधिकार असतानाही त्यांनी पती पत्नी एकत्रीकरणाचा विचार न करता पती गोेरेगाव पंचायत समितीला तर पत्नी सालेकसा पत्नीला 50 ते 60 कि.मीवर ठेवण्यात आले.पत्नी गोंदिया पंचायत समितीला तर पती सालेकसा पंचायत समितीतील नक्षलग्रस्त भागातील शाळेत जे अंतर 60 किमीच्यावर आहे. जेव्हा की पती पत्नी एकत्रीकरण शासन निर्णायानुसार एकाच शाळेत किंवा दोघामधील शाळेचे अंतर हे 30 किमीपेक्षा अधिक नसावे असे असतानाही या बदल्यामध्ये पती पत्नी एकत्रीकरणाला बाजूला सारणारे प्रशासन बदल्या पारदर्शक झाल्याचीच बोंब ठोकत आहे.
नागपूर जि.प.चे शिक्षक शुद्धोधन सोनटक्के व त्यांची पत्नी वैशाली हे दोघेही शिक्षक आहे. बदलीपूर्वी वैशाली ह्या कळमेश्वर जि.प. शाळेत तर शुद्धोधन हे सावनेर येथील खिल्लोरी शाळेत कार्यरत होते. तेव्हा दोघांमधील अंतर हे १२ कि.मी. होते. आता यांची आॅनलाईन बदली आहे. शुद्धोधन यांना रामटेक तालुक्यातील खुर्सापार अवघड क्षेत्रात तर वैशाली यांची नरखेड तालुक्यातील गुमगाव येथे बदली केली आहे. या दोन्हीतील अंतर २१२ कि.मी. आहे. शाळा जर सकाळच्या वेळेत असेल तर पहाटे ५ वाजतापासून त्यांना निघावे लागले. गुमगाव मध्ये जाण्यायेण्याचे साधन नाही. जंगल परिसर आहे. पावसाळ्यात तर गुमगावला जावू शकत नाही अशी अवस्था असते. घरी मुलगा ७ वर्षाचा आहे आणि तोही आजारी असतो. वृद्ध वडील आहे. त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे हे पतीपत्नी या बदल्यांमुळे चांगलेच हतबल झाले आहे. अशीच काहीशी अवस्था चंद्रकांत मेश्राम व कविता मेश्राम, कश्यप सावरकर व शुभांगी सावरकर, संजय धाडसे व विजया धाडसे या शिक्षक दाम्पत्यांची बदलीनंतर झाली आहे. विस्थापित झालेल्या दाम्पत्यांचे असे हजारो उदाहरण राज्यातून समोर येत असून त्या सर्वांनी रूजू झाल्यानंतर न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
झालेल्या बदल्यातून शिथिलता मिळावी म्हणून शिक्षकांनी शिक्षणाधिकारी, सीईओं यांच्याकडे निवेदन सादर केले. परंतु कुणीही जबाबदारी स्विकारायला तयार नाही. ही परिस्थिती केवळ राज्यात असून बदल्यांमुळे शिक्षकांची शिकविण्याची मानसिकता राहिली नाही, असा सूर शिक्षकांमध्ये उमटतो आहे.