शहरांच्या स्पर्धेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात

0
19
  • एक लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात
  • पश्चिम विभागातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्पर्धेत ५८शहरे पहिल्या शंभरामध्ये
मुंबई,दि.24 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत राज्यातील २८शहरांनी पहिल्या १०० क्रमांकामध्ये स्थान मिळविले असून एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील ५८शहरांनी स्थान मिळविले आहे. स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा यंदा राज्यातील सर्वात जास्त शहरांनी क्रमांक पटकविला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ची क्रमवारी आज जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील शहरांनी आपली छाप पाडल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील इंदौर येथील कार्यक्रमात राज्याला पुरस्काराने गौरविण्यात आले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली होती. या अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४जानेवारी २०१८ते १० मार्च २०१८ या कालावधीत देशातील ४२०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील ४३ अमृत शहरांनी तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या २१७ शहरांनी सहभाग घेतला होता.
राज्याला यापूर्वीच स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशातील सर्वोकृष्ट दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यासह विविध विभागातील एकूण ५२ पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण दहा पारितोषिके जाहीर झाली आहेत. देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबई शहरास तर घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई शहराने बाजी मारली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील नऊ शहरे स्वच्छ ठरली असून यातील सहा शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे तर तीन शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये नागपूर शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा, परभणीला नागरिक प्रतिसादमध्ये, भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहराचा, भुसावळ शहरास गतिमान लहान शहर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विभागस्तरीय तीन पुरस्कारांवर राज्याने नाव कोरले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार तर नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट या शहराला आणि पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारांचे वितरण मध्यप्रदेशातील इंदौर शहरात झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे पुरस्कार नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्विकारले. यावेळी नगर विकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयाचे कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, संचालक डॉ. उदय टेकाळे आदी उपस्थित होते.