बसपा-काँग्रेस आघाडीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर

0
8

नागपूर,दि.29 : आगामी दिवसात महाराष्ट्रात बसपा व काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतच्या हालचली वाढू शकतात, असे संकेत बसपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान दिले. परंतु आघाडीबाबतचा निर्णय हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती याच घेतील आणि त्या जे निर्णय घेतली तो आम्ही मान्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी निवडणुकीच्या पाशर्वभूमीवर बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीसोबत आघाडी करण्याचे संकेत दिले होते. चव्हाण यांच्या या आघाडीबाबतच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी डॉ. सिद्धार्थ यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात डॉ. सिद्धार्थ म्हणाले, खासदार चव्हाण यांनी आपली बाजू सांगितली आहे. परंतु आम्हीसुद्धा राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून बसपा कार्यकर्त्यांचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. बसपा कार्यकर्ते आघाडी करण्याची इच्छा ठेवत असतील तर त्यासंदर्भात वरिष्ठ नेतृत्वाला सांगितले जाईल. परंतु अंतिम निर्णय मात्र मायावती याच घेतील.
यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना, अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले प्रामुख्याने उपस्थित होते.