बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून द्या-देवसरकर यांची मागणी

0
8

नांदेड,दि.29ःः -जिल्ह्यातील गुलाबी बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने विमा कंपनीकडून हेक्टरी 8 हजार रूपयांची मदतीची घोषणा केली होती. परंतु जिल्ह्यामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या पीकविम्यात बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीने ठेंगा दाखविला असून संबंधित विमा कपंनीकडून बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी शिष्टमंडळासह केली.
जिल्ह्यामध्ये मागच्या खरीप हंगामामध्ये तब्बल 2 लाख 70 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. परंतु बीटी कपाशीवर गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे कापूस हे नगदी पीक असूनही बोंडआळीच्या प्रादुर्भावामुळे होत्याचे नव्हते झाले. याबाबत जिल्हा प्रशासनाने कृषी, महसूल प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त कापूस पिकाचा पंचनामा केला होता. जिल्ह्यातील तब्बल 4 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या कपाशीचे उत्पन्न 33 टक्केपेक्षा खाली आल्याचा अहवाल शासनाकडे जिल्हा प्रशासनाने पाठविला होता. याची दखल घेऊन राज्य सरकारने मदत म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 30 हजार तर बागायती शेतकऱ्यांसाठी 37 हजार देण्याचे घोषित केले होते. यात केंद्र सरकार, विमा कंपनी आणि बियाणे उत्पादक कंपनी या तिहेरी बोंडआळी नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळणार होती.  सरकार वगळता विमा कंपनी व कापूस बियाणे उत्पादक कंपनी यांनी शेतकऱ्यांना अद्याप एक रूपयांचीही मदत दिली नाही. जिल्ह्यासाठी नुकत्याच मंजूर झालेल्या पीकविम्यात मात्र विमा कंपनीने बोंडआळीग्रस्त शेतकऱ्यांची खिल्ली उडवल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात तब्बल 60 हजाराच्या वर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 24 हजार हेक्टरसाठी विमा भरला होता. यातील केवळ 40 हजार शेतकऱ्यांनाच विमा मंजूर झाला. त्यातही तब्बल 20 हजार शेतकरी व विमा न काढलेले शेतकरी असे जवळपास 3 लाख 84 हजार कापूस उत्पादक शेतकरी शासनाच्या मतानुसार पीकविमा संरक्षणापासून वंचित राहिले आहेत. याबाबत शेतकऱ्यांना तात्काळ मदत देऊन दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी भागवत देवसरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
यावेळी निवेदन देताना राज्य सल्लागार शंकर पवार निवघेकर, जिल्हाध्यक्ष उत्तर प्रशांत आबादार, जिल्हाध्यक्ष दक्षिण रामदास माळेगावे, हरभिाऊ लांगे, छत्रपती संभाजीराजे मित्रमंडळ जिल्हाध्यक्ष तिरूपती भगनुरे, अभिजीत कदम, गोविंदराव जाधव, राज पाटील, विद्यार्थी आघाडीचे अनिल देवसरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर पवार आदींची उपस्थिती होती.