शहिद पोलीसांच्या कुटुबियांच्या कोल्हापूर पोलीस दलाने केला गौरव

0
19

गडचिरोली,(अशोक दुर्गम) दि.29ः- नक्षल्यवाद्यांशी दोन हात करतांना आपल्या जिवाची पर्वा न करता कामगिरी बजावत शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी,अधिकार्यांच्या कुटुंबियाकरिता पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली व महाराष्ट्र सरकारच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात येते.यावर्षीसुध्दा 26 ते 29 जूनपर्यंत या सहलीचे आयोजन करण्यात आले होेते.यादरम्यान या शहिदांच्या कुटुबियांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध स्थळांची पाहणी केल्यानंतर त्यांच्या निवासासह राहण्याची व्यवस्था कोल्हापूर पोलीसांच्यावतीने करण्यात आली.आपल्याच विभागातील पोलीसांचे कुटुंब ज्यांचा आज आधार हिरावला गेला आहे अशा सर्व शहिदांच्या कुटुबियांच्या भावपुर्ण स्वागत करीत त्यांनी केलेल्या त्यागाचा गौरव कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक संजय मोहिते यांच्यासह त्यांच्या चमूने केला.कोल्हापूर पोलीसांच्यावतीने करण्यात आलेल्या स्वागतसमारंभाप्रंसगी शहिद पोलीस अधिकार्यांच्या कुटुबियांना पुन्हा एकदा या सत्काराप्रसंगी आपल्या मुलांने,पतीने केलेल्या कार्याचा अभिमान त्यांच्या चेहर्यावर झळकत असल्याचे दिसूून आले.

या सहलीमध्ये शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबातील एकूण 110 सदस्य तसेच दोन महिला पोलीस उपनिरीक्षक हे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहलीवर आले होते. सहली दरम्यान त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी येथील सिध्दगिरी महाराज मठ, करविरनिवासीनी श्री अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव परिसर, शाहू महाराजांचे निवासस्थान न्यू पॅलेस, ज्योतिबा मंदिर, पन्हाळा किल्ला तसेच कोल्हापूर शहरातील सर्व प्रेक्षणीय स्थळांची सहल घडविण्यात आली.शहीद पोलिस जवानांच्या ७० वीरमाता, वीरपत्नी व वीरकन्या यांचे श्री अंबाबाई भक्त समितीच्या पुढाकाराने व करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी संघाच्या वतीने प्रसाद व साडी-चोळी देऊन कोल्हापूरवासी जनतेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.
आज 29 जून रोजी सहल पूर्ण करून गडचिरोली करिता रवाना होत असतांना त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर येथे करण्यात आले होते.
निरोप समारंभप्रसंगी शहीद पोलीस पत्नी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती वाकडे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या शासनाच्या या योजनेचे आभार मानले. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबियांच्या सहली करिता कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केलेल्या नियोजनाबाबत व आदरातिथ्या बाबत आभार व्यक्त केले. महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी सहली दरम्यान कोल्हापूर येथे अक्षरशः माहेरी आल्याचा आनंद मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. महिला पोलीस उपनिरीक्षक शितल राणे यांनी नक्षल समस्याग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्र उभा असल्याची खात्री झाल्याचे सांगितले.
अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी गडचिरोलीमध्ये शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करून सहली मधील वीरपत्नी, वीरमाता-पिता व त्यांच्या पाल्यांचे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे आभार व्यक्त करून त्यांना स्मृतिचिन्ह म्हणून करवीर निवासिनी श्री अंबामातेची प्रतिमा भेट म्हणून दिली. तसेच भविष्यातही अशा सहली करीता कोल्हापूर जिल्हा पोलीस दल सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाला कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग प्रशांत अमृतकर तसेच गडचिरोली जिल्ह्यात सेवा बजावलेले व सध्या कोल्हापूर शहरात प्रभारी म्हणून काम पाहणारे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत सावंत व त्यांचे सहकारी सुनील जांभळे, प्रदीप ठाकूर, पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे,पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तसेच पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले. आभार उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अमृतकर यांनी मानले.