जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी दाखवली वृक्षदिंडीला हिरवी झेंडी

0
34

वाशिम, दि. ३० : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी व वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आज वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वृक्ष दिंडीला सुरुवात झाली.

यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपविभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, वन परिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर, आर. पी. कांबळे, वनपाल श्री. भोसले, कु. धर्माळे आदी उपस्थित होते.जिल्हा क्रीडा संकुल येथून वृक्ष दिंडीला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिव्हील लाईन्स मार्गे वन वसाहत येथे आल्यानंतर वृक्ष दिंडीचा समारोप करण्यात आला. या वृक्ष दिंडीमध्ये स्थानिक विद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडीमध्ये सहभागी शाहीर, भजनी मंडळी यांनी भजन, लोगगीतातून वृक्ष लागवडीचा संदेश दिला.

वृक्ष प्रेमींसाठी ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रम

वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘रोपे आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन व वन वसाहत येथील परिसरातील रोपे विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना रोपे वाटप करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील वृक्षप्रेमी लोकांसाठी मेडशी, वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथे वृक्ष प्रेमींना वृक्ष लागवडीसाठी सुलभरीत्या रोपांची उपलब्धता होण्यासाठी वन विभागाच्यावतीने ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रम अंतर्गत रोपे विक्री केंद्र उभारण्यात आल्याचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील वृक्ष प्रेमींना रोपांच्या उपलब्धतेबाबत काही अडचणी असल्यास किंवा अधिक माहितीकरिता त्यांनी स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.