अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम

0
112

वाशिम, दि. ३० :  सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित  जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. १० वी व १२ वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमाकरीता तसेच इतर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळू शकतात. राज्यात नुकताच इ. १० वी व १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झालेली आहे. परिणामी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कारणाकरीता अर्ज प्राप्त होत आहेत. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्यादृष्टीने त्यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत मिळण्याच्यादृष्टीने विशेष मोहिम आखण्यात आलेली आहे.

या मोहिमेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना https://www.etribevalidity.mahaonline.gov.in या (ई-ट्राईब) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने गुणवत्तेच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात येईल. या संदर्भात अमरावती समितीच्या पोलीस दक्षता पथकाला देखील गृह व शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती येथे ०७२१-२५५०९९१ हा हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आलेला असून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वा. या कालावधीत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दुरध्वनीवरून वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. समितीमार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सदर मोहिमेच्या कामकाजाचा वरिष्ठ व अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जात असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्वरीत वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्यादृष्टीने सर्व प्रक्रीया पूर्ण करून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. अमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती ही शासकीय विश्रामगृहाजवळ, राज्य माहिती आयुक्त यांचे कार्यालयासमोर, सना हाऊस, जुना बायपास रोड, चपराशीपुरा, अमरावती-४४४६०२ येथे असून समितीचा दुरध्वनी क्र. ०७२१-२५५०९९१ व ईमेल आयडी [email protected] आहे.