काँग्रेसने संधी दिल्यास लोकसभा लढणार-आशिष देशमुख

0
7

नागपूर,दि.02ः-पक्षावर वारंवार शरसंधान करणारे काटोलचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.वेगळा विदर्भ व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आशिष देशमुख यांनी सहा महिन्यांपासून पक्षाविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. हिवाळी अधिवेशन काळात डिसेंबरमध्ये त्यांनी वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र बरेच गाजले. आता पावसाळी अधिवेशनांच्या तोंडावर त्यांनी स्वगृही म्हणजे काँग्रेस प्रवेशाचे संकेत देऊन लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत.नाना पटोले यांनी सहा महिन्यांपूर्वी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपला रामराम केला. तेव्हापासून देशमुख यांच्याही राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. भाजपने त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही. तसेच, त्यांनीही अद्याप पक्ष सोडलेला नाही. मात्र, अधिवेशन काळात वेळ आल्यास पक्षाचा त्याग करू शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे आगामी निवडणुकीत देशातील पहिल्या पाच मतदारसंघात नागपूर येण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कोण राहील, याचीही चर्चा सुरू झाली. गेल्यावेळी विलास मुत्तेमवार होते. यात त्यांचा सुमारे दोन लाख ८० हजार मतांनी पराभव झाला.  यात आता आशिष देशमुख यांनी थेट पक्षात प्रवेश करून निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.