टाळ-मृदंगाच्‍या निनादात तुकोबांच्‍या पालखीचे प्रस्‍थान

0
18

पुणे,दि.05- संत तुकाराम महाराजांच्या 333 व्या पालखी प्रस्‍थान सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. टाळ-मृदंग आणि तुकोबांच्या नामघोषात ही पालखी पंढरपुरकडे प्रस्‍थान झाली आहे. यासाठी शेकडो वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या घेऊन देहूनगरीमध्ये दाखल झाले आहेत. तुकोबांच्‍या नामघोषाने देहूनगरी दुमदुमत आहे.

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥

विठो माउलिये हाचि वर देईं । संचारोनि राहीं हृदयामाजी ॥२॥

तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

आज (गुरूवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्त यांच्‍या हस्‍ते श्रींची महापूजा आणि शिळामंदिरातील महापूजा झाली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तापोनिधी नारायण महाराज समाधीची महापुजा करण्यात आली. त्‍यानंतर साधारणत: 2 वाजेच्‍या सुमारास तुकोबारायाची पालखी पंढरपुरकडे प्रस्‍थान झाली.पावसाने हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. पंढरपुरच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शेकडो दिंड्या घेऊन देहूत दाखल झाले आहेत. मुख्य देऊळवाड्यात पहाटेपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. देहू ग्रामपंचायत प्रशासनही सोहळ्यातील भाविकांना आवश्‍यक त्‍या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून पुर्ण तयारीत आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक संस्थांनी, नागरिकांनी सहभाग घेतला आहे.