विधान परिषदेचे ११ आमदार बिनविरोध

0
13

मुंबई,दि.10-विधानसभेतून ज्येष्ठ सभागृहात म्हणजेच विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ सदस्यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी साेमवारी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सर्वच्या सर्व ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

राष्ट्रवादीचे ४, काँग्रेस ३, शिवसेनेचे २, शेकाप आणि रासप प्रत्येकी १ अशा ११ सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत २७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ११ अर्ज अपेक्षित होते. मात्र, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपच्या तिकिटावर अर्ज भरण्यास नकार दिला होता. त्यांनी ‘रासप’च्या तिकिटावर उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे भाजपने १२ वा उमेदवार रिंगणात उतरवला होता. परिणामी मतदान होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज देशमुख यांना शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि मतांसाठी होणारा घोडेबाजारही टळला. सायंकाळी पाच वाजता सर्व ११ उमेदवारांना निवडून आल्याची प्रमाणपत्रे निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. या निवडीमुळे भाजप-शिवसेनेच्या परिषदेतील संख्याबळात मोठी वाढ झाली अाहे. त्यामुळे सध्या विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्यास आलेले सभापती आणि उपसभापतिपद धोक्यात आले आहे.