सिकलसेल रुग्णांसाठी एक महिन्यात उपचार केंद्र सुरु करणार- गिरीश महाजन

0
13

नागपूर, दि. 10 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे सिकलसेल आणि हिमोग्लोबीनोपॅथी व थॅलेसिमीया उपचार केंद्र कार्यान्वित करण्याकरिता केंद्र शासनाच्या इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेमार्फत अर्थ सहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून नागपूरमध्ये सिकलसेल रुग्णांसाठी एक महिन्यात उपचार केंद्र सुरु करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य अनिल सोले यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री. महाजन बोलत होते.
श्री. महाजन म्हणाले, गर्भजल परीक्षण केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पूर्ववत सुरु करण्याकरिता कार्यवाही करण्यात येत आहे. या संदर्भात सिकलसेल संबंधित रुग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विभागाच्या नियंत्रणाखालील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे सिकलसेल ग्रस्त रुग्णासाठी वेगळे केंद्र आयसीएमआरच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. या संस्थेमध्ये सिकलसेल बाबत चाचण्या, गर्भजल तपासणी करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच मेहता फांऊडेशन मार्फत साडे तीन एकर जागा आरक्षित केली आहे. या ठिकाणी लवकरच सिकलसेल रुग्णांसाठी केंद्र सुरु केले जाईल.या चर्चेत सदस्य श्री. नागोराव गाणार यांनी सहभाग घेतला.