100 टक्के अनुदानासाठी शाळा कृती समितीचे आंदोलन सुरुच

0
33

नागपूर,दि.13 -महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती समाधानी नसून सभागृहात १00 टक्के अनुदानाची घोषणा झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्णय एकमताने घेण्यात आला. हे आंदोलन अजूनही सुरुच आहे यासाठी शिक्षक बांधवांनी मॉरीस टी पॉइंटवर पाण्यापावसात अख्खी रात्र जागून काढली. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानीत कृती समितिचा महाआक्रोश मोर्चा आपल्या मागण्यांसाठी विधिमंडळावर धडकला होता.यावेळी कृती समितीचे शिष्टमंडळ विनोद तावडे यांना भेटले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात येवून शिक्षणमंत्री यांनी यावर सभागृहात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु या आश्‍वासनावर महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानीत कृती समिती समाधानी नाही. यावेळी या शिष्टमंडळामध्ये नागपूर विधानपरिषद शिक्षक मतदार संघाचे आमदार  नागो गाणार, महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानीत शाळा कृती समितीचे अध्यक्ष  तात्यासाहेब म्हसकर, उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, प्रा. नितिन टाले, संगीता शिंदे, पी.आर. ठाकरे, सुधाकर वाहुरवाघ, अजय भोयर,सुरेश शिरसाठ,कामनापुरे सर, आर. झेड. बाविस्कार सहभागी होते.२0टक्के अनुदान प्राप्त शाळांना प्रचलित नियमानुसार १00 टक्के अनुदान, अघोषित शाळांना अनुदानासह घोषित करणे,२0 टक्के अनुदानीत शाळांमधील शिक्षकांना सेवा संरक्षण देणे व आदिवासी क्षेत्रातील शाळांना १00 टक्केअनुदान मंजुर करणे या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानीत कृती समिति तर्फे सेवाग्राम येथून दि.७ जुलै रोजी ही पायदळ दिंडी काढण्यात आली होती.

मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे यशवंत स्टेडियम येथून मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. सभागृहात घोषणा होत नाही तो पर्यंत मोर्चेकरी जागेवरुन हलणार नाही, असा पावित्रा मोर्चेकर्‍यांनी घेतल्याने मंगळवार, बुधवार अशी दोन दिवस आणि दोन रात्र मॉरिस टी पाँंटवर मोर्चेकरी ठाण मांडून होते. विशेष म्हणजे या मोर्चात महिलांचाही समावेश होता. दरम्यान पावसाने हजेरी लावल्यानंतर मोर्चेकर्‍यांची काही वेळ तारांबळ उडाली. नंतर मात्र, मोर्चेकरी एकत्रित आले. मोर्चाकर्‍यांच्या प्रबळ इच्छेमुळे आमदार नागो गाणार यांनी शिक्षकांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा घडविली. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्या. मात्र, त्यासाठी निश्‍चित कालावधी स्पष्ट केला नाही.आता आंदोलनाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली आहे. नियमाप्रमाणे मॉरिस टी पॉईंटवरुन मोर्चा हलवित यशवंत स्टेडियम येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.