विद्युत शॉक लागून युवकाचा मृत्यू

0
7

लाखनी,दि.18ः-वेल्डींग दुकान बंद करीत असताना जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना लाखनी येथे सोमवारी (ता.१६) रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घडली.
तामेश्‍वर उर्फ गोलू सुरेश बावनकुळे (२१) रा. प्रभाग क्र. २ लाखनी, असे मृत युवकाचे नाव आहे. तामेश्‍वरचे काही वर्षाआधी वडिल मरण पावले तसेच चार बहिणींचे लग्न झाले होते. गरिबीचे चटके सहन करीत आई व स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी येथील विराट इंजिनिअरींग वेल्डींग दुकानात तो एक वर्षापासून रोजंदारीवर कामाला होता. घटनेच्या दिवशी रात्री उशिरा दुकान बंद करण्याच्या लगबगित अनावधानाने हातातील लोखंडी पत्राचा जिवंत ताराला स्पर्शझाल्याने तो घटनास्थळीच जमिनीवर धारातिर्थी पडला. दरम्यान, उपचारार्थ लाखनी ग्रामीण रुग्णालयात दुकान मालक विराट गायधनी यांनी दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. एक सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष तथा मृतकाचे काका अनिल बावनकुळे व शिष्टमंडळाच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी र्मग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी १२.४५ वाजताच्या सुमारा स्थानिक स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाच्या कुटुंबास शासनातर्फे आर्थिक मदतीची मागणी एक सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.