प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय – गिरीश महाजन

0
7

नागपूर ,दि.18- प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणे ही सरकारची भूमिका आहे. पुढील वर्षीपासून उस्मानाबाद जिल्ह्यासह कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत केली. अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

राज्यात वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्ग आरक्षण असतानाही प्रादेशिक आरक्षण लादल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातले सदस्य आक्रमक झाले होते. यामुळे सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला. प्रादेशिक आरक्षण रद्द करून मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवून त्यांची प्रवेश क्षमता वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महाजन यांनी हे आरक्षण 1985 पासून लागू आहे, असे सांगत तत्कालीन कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने मराठवाड्यात एकही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले नाही, असे सांगितले. यावर विरोधकांनी आक्षेप घेत आणि उत्तरावर असमाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे ही मागणी केली. तोपर्यंत लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याची विनंती केली. या वेळी विरोधी सदस्यांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या.