बळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी केंद्राकडून १३ हजार ६५१ कोटी मंजूर- केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी

0
15

राज्यातील ९१ जलसिंचन प्रकल्प मे २०१९ पर्यंत पूर्ण होणार
नवी दिल्ली दि.१९ः: महाराष्ट्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनीङ्क योजनेंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून १३ हजार ६५१ कोटींचा निधी मंजूर झाला असून पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीनंतर आज परिवहन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.गडकरी यांनी ही माहिती दिली. ‘बळीराजा जलसंजीवनीङ्क योजनेसाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या निधीपैकी केंद्र शासनाकडून ३ हजार ८३१ रूपये केंद्राकडून देण्यात येणार तर उर्वरीत ९ हजार ८२० कोटी नाबार्ड कडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे श्री.गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील व भिवंडीचे खासदार कपील पाटील यावेळी उपस्थित होते.
१४ जिल्ह्यांतील ९१ प्रकल्पांसाठी १३ हजार ६५१ कोटींचा निधी
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्या ग्रस्त भागासाठी ‘बळीराजा जलसंजीवनीङ्क योजना तयार केली आहे. आजच्या कॅबीनेटच्या निर्णयाने विदर्भातील ६, मराठवाड्यातील ५ तर उर्वरीत ३ अशा राज्यातील एकूण १४ जिल्ह्यांमधील ९१ जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने १३ हजार ६५१ कोटींच्या निधीस मंजुरी दिली असल्याचे श्री.गडकरी यांनी सांगितले.
विदर्भातील ६६ प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील १८ प्रकल्प, वाशिम जिल्ह्यातील १८, यवतमाळ जिल्हयातील १४, बुलडाणा जिल्ह्यातील ८, अकोला जिल्ह्यातील ७ आणि वर्धा जिल्ह्यातील १ अशा एकूण ६६ जलसिंचन प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
मराठवाड्यातील १७ प्रकल्पांसाठी १ हजार २३ कोटी
मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील १७ प्रकल्पांसाठी १ हजार २३ कोटी ६३ लाखांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. या विभागातून औरंगाबाद जिल्ह्यातील ५ प्रकल्प, जालना जिल्ह्यातील ६, नांदेड जिल्ह्यातील २, लातूर जिल्ह्यातील ३ आणि बीड जिल्ह्यातील १ अशा एकूण १७ प्रकल्पांचा समावेश आहे.
राज्यातील ८ मोठे व मध्यम प्रकल्पांसाठी ९ हजार ५२१ कोटी
राज्यातील ८ मोठे व मध्यम प्रकल्पांसाठी ९ हजार ५२१ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. यात सांगली जिल्ह्यातील टेंभु प्रकल्प, सातारा जिल्ह्यातील उर्मोडी, धुळे जिल्ह्यातील सुलवाडे-जांफळ, जळगाव जिल्ह्यातील शेळगाव आणि वरखेड-लोंढे, अकोला जिल्ह्यातील घुंगशी आणि पूर्णा बरॅज, बुलडाणा जिल्ह्यातील जीगाव या जल सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे.
४ वर्षात राज्यातील जल सिंचन प्रकल्पांसाठी १ लाख १५ हजार कोटी
राज्यातील अर्धवट जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या ४ वर्षात केंद्र शासनाने १ लाख १५ कोटींचा निधी दिला असून यामुळे राज्यातील ११ लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले. प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील २६ प्रकल्पांसाठी ४० हजार कोटी, पिंजाळ-दमनगंगा आणि तापी-पार-नर्मदा या नदीजोड प्रकल्पांसाठी ७५ हजार कोटी आणि बळीराजा जलसंजीवणी योजनेसाठी १३ हजार ६५१ कोटींचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.