लाच देऊन नोकरी मिळवल्याप्रकरणी भाजपा खासदाराच्या कन्येसह 19 अधिकारी अटकेत

0
10

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था) दि.१९- लाच देऊन नोकरी मिळवल्या प्रकरणी भाजपाचे तेजपूरचे खासदार आर.पी. शर्मा यांची कन्या पल्लवी शर्मासहीत 19 सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या 19 जणांनी 2016मध्ये आसाम लोकसेवा आयोगाची (एपीएससी) परीक्षा दिली होती. मात्र, तपासणीदरम्यान उत्तर पत्रिकेतील त्यांचे हस्ताक्षर मिळतेजुळते नसल्याचे आढळल्याने या 19 जणांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

एपीएससीमध्ये रोखरक्कम देण्याच्या मोबदल्यात झालेल्या नोकरी घोटाळ्याची चौकशी दिब्रूगड पोलीस करत होते. चौकशी अंतर्गत ज्या अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला होता, त्या सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ताक्षर चाचणी घेण्यात आली. सुरुवातीला या अधिकाऱ्यांच्या उत्तर पत्रिकेच्या फॉरेन्सिक चाचणी गोंधळ झाल्याचे आढळून आले होते. दिब्रूगडचे पोलीस अधीक्षक गौतम बोरा यांनी सांगितले की, हस्ताक्षर चाचणी घेण्यात आलेल्या या 19 अधिकाऱ्यांचे उत्तर पत्रिकेतील अक्षर जुळले नाही. दरम्यान यापूर्वी, या प्रकरणी एपीएससीचे तत्कालीन अध्यक्ष राकेश पाल  यांच्यासहीत अन्य तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, 21 जूनला 13 सरकारी अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. बुधवारी अटकेची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये तेजपूरचे भाजपा खासदार आर.पी.शर्मा यांची कन्या पल्लवी शर्माचाही समावेश आहे.