दुधाला प्रतिलिटर 5 रुपये, दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदान

0
17

नागपूर, दि. 20 : दुधाच्या निर्यातीसाठी 5 रुपये प्रतिलिटर व दूध भुकटीच्या निर्यातीसाठी 50 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे विधानसभेत पदुममंत्री महादेव जानकर व विधानपरिषदेत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घोषित केले.

यावेळी श्री. जानकर म्हणाले, राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रक्रिया संस्था यांनी उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधासाठी कोणतेही अनुदान देय राहणार नाही. तथापि पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधासाठी राज्य शासन प्रतिलिटर 5 रुपये रुपांतरण अनुदान देईल. मात्र सदर अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस अनुज्ञेय राहील. तसेच जे दूध भुकटी उत्पादक 5 रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदानाचा लाभ घेतील, त्यांना दूध भुकटी निर्यातीसाठीच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही.दि. 10 जुलै 2018 रोजी घोषित केलेली योजना तसेच आज रोजी घोषित करण्यात येत असलेली योजना या दोन्ही योजनांचा लाभ संबंधित सहकारी/खासगी दूध प्रक्रिया संस्था/दूध पुरवठा करणाऱ्या संस्था यांनी जर दि. 21 जुलै 2018 पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 रुपये प्रतिलिटर दर दिल्यासच अनुज्ञेय राहील.

वरील निर्णयास राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध उत्पादक/दूध प्रक्रिया करणाऱ्या/दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांनी एकमताने सहमती दर्शविलेली आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रक्रिया संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची व प्रतिनिधींची शेतकऱ्यांना/दूध उत्पादकांना द्यावयाच्या दूध खरेदी दराबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, सुरेश धस, राहुल मोटे, राहुल कुल, सतेज ऊर्फ बंटी पाटील, रामहरी रुपनवर आदी उपस्थित होते.